
बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। निर्गुडी-हिवरसिंगा रस्त्यावर एका सोनार व्यावसायिकाला कारमधून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी अडवून सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून रोहन ऊर्फ बॉबी संजय गुणवंत या २४ वर्षीय आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि लुटलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिवरसिंगा येथील व्यावसायिक रमेश उदावंत हे २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निर्गुडी येथील आठवडी बाजारात मोटारसायकलने सोन्या-चांदीचे दागिने घेऊन जात होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून जबरदस्तीने दागिने लुटून नेले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोहन ऊर्फ बॉबी याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून एमएच १२ जेएम ४३०० क्रमांकाची कार आणि चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis