दुचाकी चोरणारे 4 विधीसंघर्षित बालक ताब्यात; ११ दुचाकी जप्त
Theft of bicycles for fun
दुचाकी चोरणारे 4 विधीसंघर्षित बालक ताब्यात; ११ दुचाकी जप्त


नाशिक, ६ ऑगस्ट (हिं.स.) : मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या चार विधिसंघर्षित बालकांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.या कारवाईमुळे नाशिक शहरासह पालघर आणि धुळे जिल्ह्यातील एकूण नऊ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अर्जुन कांदळकर यांना संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दत्तनगर, अंबड परिसरात सापळा रचून चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील चार, गंगापूर पोलीस ठाण्यातील दोन, सातपूर पोलीस ठाण्यातील एक, पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्यातील एक आणि धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले.

याशिवाय आणखी दोन चोरीच्या दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर प्रो, बजाज बॉक्सर आणि होंडा युनिकॉर्न या दुचाकींचा समावेश आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नऊटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, संदीप शेवाळे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande