
मुंबई, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (MHE) व्यवसायाने महाराष्ट्रातील खालापूर येथील आपल्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात कामकाज सुरू केल्याची घोषणा आज केली. देशांतर्गत उत्पादनाला बळकटी देण्याच्या आणि भारतातील लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग व पुरवठा साखळीच्या विकासाचा पुढील टप्पा सक्षम करण्याच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे.
360 एकरवर पसरलेल्या नवरोजी गोदरेज इंडस्ट्रियल पार्कमध्ये स्थित असलेल्या या केंद्राची रचना उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. या केंद्राची वार्षिक उत्पादन क्षमता 6,000 युनिट्स इतकी असून, मागणीनुसार ती 15,000 युनिट्सपर्यंत वाढवता येऊ शकते. यामुळे नावीन्यपूर्ण आणि स्थानिक पातळीवर डिझाइन तसेच उत्पादित केलेली मटेरियल हँडलिंगची उत्पादने व उपाययोजना (सोल्यूशन्स) उपलब्ध करून देण्याची गोदरेजची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.
न्हावा शेवा बंदर आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्रांच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी स्थित असल्याने, ही सुविधा देशांतर्गत आणि निर्यात अशा दोन्ही बाजारपेठांसाठी अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. या प्रकल्पात आर्टिक्युलेटेड ट्रक्ससह विविध प्रकारची मटेरियल हँडलिंग उपकरणे (साहित्य हाताळणीची साधने) तयार केली जातात; विशेष म्हणजे, या श्रेणीतील उत्पादने बनवणारी गोदरेज ही एकमेव भारतीय कंपनी आहे. ही उत्पादने जगभरातील 40 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात, जे या व्यवसायाचे अभियांत्रिकी क्षेत्रातील नैपुण्य आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमता दर्शवते.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट बिझनेसचे बिझनेस प्रमुख, श्री. अनिल लिंगायत म्हणाले, आमच्या खालापूर येथील कारखान्यातील कामकाजाची सुरुवात ही भारताची मटेरियल हँडलिंग उत्पादन परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. वेगाने बदलणाऱ्या लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे उपाय प्रदान करण्यासाठी, या प्रकल्पात प्रगत ऑटोमेशन, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि स्वदेशी अभियांत्रिकी यांचा संगम साधण्यात आला आहे. भारत आपली उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षमता मजबूत करत असताना, मालाची कार्यक्षम वाहतूक आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रकल्पाद्वारे, आम्ही केवळ क्षमता वाढवत नाही, तर अधिक मजबूत पुरवठा साखळी तयार करण्यास, आत्मनिर्भरतेला पाठिंबा देण्यास आणि मेक इन इंडिया, पीएम गती शक्ती तसेच विकसित भारत यांसारख्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांमध्ये योगदान देण्यास मदत करत आहोत.
भविष्यासाठी सज्ज उत्पादन केंद्र म्हणून तयार केलेल्या या सुविधेत, रोबोटिक वेल्डिंग, स्वयंचलित पेंटिंग, डिजिटल असेंब्ली मार्गदर्शन, स्मार्ट गुणवत्ता हमी प्रणाली आणि अंतिम चाचणी यांसारख्या प्रमुख उत्पादन प्रक्रियांमध्ये प्रगत ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. साधन संपत्तीची बचत करणाऱ्या उत्पादन प्रक्रिया, स्वयंचलित पेंट प्रणाली आणि ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिकाऊपणा कामकाजात अंतर्भूत करण्यात आला आहे. नुकतेच इकोवॅडिस सुवर्णपदकाने सन्मानित झालेल्या गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा जागतिक स्तरावर शाश्वततेच्या कामगिरीसाठी मूल्यांकन केलेल्या सर्वोत्तम 5% कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
खालापूर येथील सुविधा गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्टता, नावीन्याचा ध्यास आणि अशा उपाययोजनांच्या निर्मितीप्रती असलेली कटिबद्धता अधिक दृढ करते. कारण या उपाययोजना भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम उत्पादन आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून उदयास येण्यास मदत करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर