
मुंबई, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) ग्राहकांसाठी हायब्रिड स्वरूपाचे नवीकरणीय ऊर्जा पर्याय पुरवणाऱ्या ऑयस्टर रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने गुजरातच्या दयापार येथे 52.8 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे कामकाज सुरू झाल्याची घोषणा आज केली. भारतातील आघाडीची स्टेनलेस-स्टील उत्पादक कंपनी जिंदाल स्टेनलेस लिमिटेड (JSL) साठी हा प्रकल्प विकसित करण्यात आला असून, 30 जुलै 2026 रोजी याच्या व्यावसायिक कामकाजास सुरुवात झाली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे ऑयस्टर रिन्यूएबलचे या राज्यात पदार्पण झाले आहे. तसेच, ऑयस्टरतर्फे जेएसएलसाठी विकसित केल्या जाणाऱ्या एकूण 315.6 मेगावॅटच्या सौर-पवन हायब्रिड प्रकल्पाचा (ज्यामध्ये मध्य प्रदेशातील 216 मेगावॅट आणि गुजरातमधील 99 मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे) गुजरात-पवन ऊर्जा प्रकल्प हा दुसरा टप्पा आहे.
या प्रकल्पातील 16 टर्बाइन्ससाठी अंदाजे 385 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे; गुजरातमध्ये उभारल्या जाणाऱ्या एकूण 30 टर्बाइन्सच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या 725 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचाच ही रक्कम हा एक भाग आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 2,000 कोटी रुपयांहून अधिक असून, त्यापैकी 132 कोटी रुपयांची गुंतवणूक जेएसएलद्वारे करण्यात आली आहे.
सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या इंडियन इलेक्ट्रिसिटी ग्रिड कोड, 2023 तसेच सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचे (CEA) कनेक्टिव्हिटी व कम्युनिकेशनविषयक तांत्रिक निकष तसेच सुरक्षा नियमांचे पालन केल्याचे प्रमाणपत्र या प्रकल्पाला मिळाले आहे; यामुळे हा प्रकल्प व्यावसायिकरीत्या कार्यान्वित होण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध झाले आहे.
ऑयस्टर रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सिद्धार्थ भाटिया म्हणाले, या प्रकल्पामुळे ऑयस्टरचे गुजरातमध्ये पदार्पण झाले आहे आणि प्रकल्पाचा हा दुसरा टप्पा आम्हाला राज्यातील आमच्या पवन ऊर्जा क्षमतेच्या पूर्ण उभारणीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे घेऊन जातो. गुजरातमध्ये उपलब्ध पवन ऊर्जेच्या उत्तम स्रोतामुळे, प्रकल्पाच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये ही एक मोलाची भर पडली आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर, त्याद्वारे दरवर्षी सुमारे 92,000 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन टाळले जाण्याची अपेक्षा आहे. 3.5 गिगावॅट (GW) क्षमतेचे प्रकल्प उभारण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नियोजनानुसार उर्वरित क्षमता कार्यान्वित करण्याच्या दिशेने आमची वाटचाल योग्य प्रकारे सुरू आहे.
उर्वरित 14 टर्बाइन्स टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे गुजरात प्रकल्प पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचेल आणि जेएसएलच्या डीकार्बोनायझेशन (कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या) उद्दिष्टांना बळ देणारा अक्षय्य ऊर्जेचा पाया अधिक मजबूत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर