
जळगाव, 06 ऑगस्ट (हिं.स.)देशात सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मागच्या काही दिवसापासून घसरणीचा कल असलेल्या सोन्याच्या दरांत अचानक वाढ होऊ लागल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तर जळगावच्या सुवर्णनगरीतही सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.आज २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २,८९० रुपयांची वाढ झाली असून तो १,४९,७३० रुपये इतका झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २,६५० रुपयांची वाढ होऊन तो १,३७,२५० रुपये झाला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २,१७० रुपयांची वाढ होऊन तो १,१२,३०० रुपये इतका झाला आहे.मात्र, राष्ट्रीय स्तरावर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून १ ग्रॅम चांदीचा दर २४० रुपये इतकाच कायम आहे.जळगावच्या सराफा बाजारातही गेल्या २४ तासांत सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात सोने प्रति तोळा २,०६० रुपयांनी महागून १,४९,६५९ रुपये, तर चांदी तब्बल ५,१५० रुपयांनी वाढून २,३३,८१० रुपये प्रति किलो झाली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. आगामी काही दिवसांतही बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर