वर्धा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15 सप्टेंबरला धरणे आंदोलन
वर्धा, 12 सप्टेंबर (हिं.स.)। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 15) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची
मंगळवारी ग्रामीण विभागातील आरोग्य यंत्रणा होणार ठप्प


वर्धा, 12 सप्टेंबर (हिं.स.)। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 15) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस देण्यात आली आहे. आंदोलनाच्या दिवशी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ठप्प पडण्याची शक्यता असल्याचे आरोग्य कर्मचारी संघटनेने कळविले आहे.

आरोग्य कर्मचारी ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, त्यांच्या वेतनाशी संबंधित प्रश्न, रिक्त पदे, पदोन्नती, ऑनलाइन कामाचा अतिरिक्त भार, वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रलंबित बिले यांसह विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.

याशिवाय अशकालीन स्त्री परिचरांना गणवेश, दिवाळी-भाऊबीज भेट, अंशकालीन स्त्री परिचरांच्या कामाचे नियोजन आणि निश्चित कामे देणे, तसेच मनुष्यबळाची कमतरता आदी प्रश्नही प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एकूण नऊ प्रमुख मागण्या असून, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप उटाणे यांनी दिली. आंदोलनाच्या दिवशी सामूहिक रजा घेऊन आरोग्य कर्मचारी, कंत्राटी आरोग्य सेविका आणि अंशकालीन स्त्री परिचर सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande