
सेवा रस्ते झाले पार्किंगसाठी; पादचारी, दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी महानगरासह जिल्ह्यातील विविध तालुकास्थानांतून जाणाऱ्या महामार्गांवर वर्षानुवर्षांपासून कच्ची व पक्की अतिक्रमणे वाढत असताना त्यांच्याविरोधात अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याची स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अतिक्रमणांविरोधात कारवाई अपेक्षित असतानाही बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाकडून केवळ वरवरच्या कारवाया केल्या जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
परभणी महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गंगाखेड महामार्गावर उड्डाणपुलापासून ब्राह्मणगाव शिवारापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्यावरही विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याचे चित्र आहे. छोटे-मोठे हॉटेल, पानटपऱ्या, गॅरेज आणि ऑटोमोबाईल्सच्या दुकानांमुळे अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांचा वापर व्यवसायासाठी तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी होत आहे.परिणामी दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मुख्य महामार्गावरूनच धोकादायक पद्धतीने मार्गक्रमण करावे लागत असून, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
वसमत रस्त्यावरही अतिक्रमणांचा विळखा
महानगरातून जाणाऱ्या वसमत रस्त्यावरही दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. कारेगाव जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर विविध प्रकारचे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. शासकीय दूध डेअरीलगतच्या संरक्षण भिंतीच्या परिसरात गेल्या दोन-अडीच महिन्यांतच मोठ्या संख्येने नवीन अतिक्रमणे उभी राहिल्याचे दिसून येत आहे.खानापूर नाका, विद्यापीठ प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, पाणीपुरी व चाटचे स्टॉल, सेकंडहँड फर्निचरची दुकाने, नर्सरी आदी व्यावसायिकांनी जागा व्यापल्या आहेत. काही व्यावसायिकांनी बांधकाम विभागाच्या नाल्यांवर तसेच रस्त्याच्या कडेलाही तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने उभारल्याचे चित्र आहे.
रस्तेच बनले पार्किंगसाठी
या मार्गावरील काही मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानांसह हॉटेलचालकांनी वाहनांच्या पार्किंगसाठी रस्त्याच्या जागेचा वापर सुरू केला आहे. काही रुग्णालये आणि बँकांच्या परिसरातही पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महामार्गाच्या जागेचा वापर पार्किंगसाठीच केला जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील काही उपहारगृह चालकांनीही आपल्या शेड्स पुढे वाढवल्याचे दिसत आहे. त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या रस्त्याच्या जागेवर अतिक्रमणांचा भार वाढत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
कठोर कारवाईची गरज
महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, पादचारी व दुचाकीस्वारांची गैरसोय तसेच अपघातांचा धोका वाढत असल्याने संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. केवळ नोटिसा किंवा तात्पुरत्या कारवायांऐवजी अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis