
50 विद्यार्थी दाखवले, प्रत्यक्षात एकही उपस्थित नाही
केवळ 13 बेडची व्यवस्था
गैरव्यवस्थेवर समिती संतप्त
यवतमाळ, 12 सप्टेंबर (हिं.स.)। शहराबाहेरील सदाशिव इंगळे अपंग, मतिमंद निवासी शाळेतील कथित गैरव्यवस्थेची महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीने शुक्रवारी (दि. 11) अचानक पाहणी केली. शाळेतील असुविधा, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, अपुरी निवासव्यवस्था आणि जेवणाच्या सुविधेतील त्रुटी पाहून समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेचा कारभार समाधानकारक नसल्याचे निरीक्षण नोंदवत शाळा बंद करण्याच्या सूचना समितीने दिल्याची माहिती आहे.
अंदाज समितीत आमदार सदाभाऊ खोत, आमदार मंदा विजय म्हात्रे, आमदार मनीषा चौधरी आणि आमदार सतीश चव्हाण यांचा समावेश होता. समितीच्या सदस्यांनी शाळेतील प्रत्येक खोलीची पाहणी करून उपलब्ध सुविधा, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तसेच व्यवस्थापनाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.
विशेष म्हणजे, शाळेच्या पटावर 50 विद्यार्थी असल्याची नोंद असताना समितीच्या पाहणीवेळी एकही विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. तसेच 50 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या निवासी शाळेत केवळ 13 बेड उपलब्ध असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. सर्व शिक्षकही उपस्थित नसल्याचे आढळले.
सदाशिव इंगळे अपंग, मतिमंद निवासी शाळा ही भाजपचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.
अचानक शाळेकडे मोर्चा
अंदाज समिती महागाव दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला समितीने तहसील कार्यालयाला भेट दिली. उपविभागीय अधिकारी राम मुळे, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी ओमकार एकाळे आणि तहसीलदार अभय मस्के यांनी समितीचे स्वागत केले.
तहसीलदारांच्या कक्षात समितीने विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अचानक निवासी शाळेकडे मोर्चा वळविला. समितीच्या या अनपेक्षित पाहणीमुळे संबंधित विभागात खळबळ उडाली. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल, पंचायत आणि समाजकल्याण विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
शाळेतील नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत आढळून आल्याने समितीच्या सदस्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला. स्थानिक गटविकास अधिकारी तसेच समाजकल्याण विभागाच्या जिल्हा अधीक्षक मंगला मून यांच्यावरही सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
शाळेच्या कारभारासंदर्भातील कागदपत्रे, विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपलब्ध सुविधा आणि व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीबाबत समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या नावावर चालविल्या जाणाऱ्या निवासी व्यवस्थेत प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे चित्र समोर आल्याने समितीच्या या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी