गणरायाच्या स्वागतासाठी परभणी सज्ज
दुष्काळसदृश्य परिस्थितीतही गणेशोत्सवाचा उत्साह बाजारपेठांमध्ये मूर्ती खरेदीसाठी गर्दी परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। विघ्नहर्त्या श्री गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि. 14) शहरासह जिल्ह्यात आगमन होणार आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांप
Q


दुष्काळसदृश्य परिस्थितीतही गणेशोत्सवाचा उत्साह

बाजारपेठांमध्ये मूर्ती खरेदीसाठी गर्दी

परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। विघ्नहर्त्या श्री गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि. 14) शहरासह जिल्ह्यात आगमन होणार आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने दडी दिल्याने जिल्ह्यात सर्वदूर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या परिस्थितीतही गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम असून मोठ्या इच्छा-आकांक्षांसह संपूर्ण जिल्हा श्रींच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि हर्षोल्हासात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. श्रींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर घराघरांत तसेच गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. विविध मंडळांनी भव्य मंडप उभारण्यास सुरुवात केली असून सजीव देखावे तसेच चल देखाव्यांसाठी आवश्यक व्यासपीठ व इतर संरचना उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर दुतर्फा विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, पताका आणि स्वागत कमानी उभारण्यास सुरुवात झाली आहे. बारा दिवसांच्या गणेशोत्सवानिमित्त काही मंडळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन केले आहे.

शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये विविध आकारांच्या आणि आकर्षक छटांच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. कोकणातील पेण येथील तसेच स्थानिक कलावंतांनी साकारलेल्या सुंदर गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून या मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही गणेश मंडळांनी गेल्या आठवड्यापासूनच मूर्तींचे बुकिंग करून ठेवले आहे.

शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये कुटुंबांसह चिमुकल्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

वसमत रस्त्यावरील काळी कमान, कारेगाव रस्त्यावरील देशमुख कॉर्नर, मध्यवस्तीतील गांधीपार्क, अष्टभुजा चौक, गुजरी बाजार, जिंतूर रस्त्यावरील जेल कॉर्नर आणि गणपती चौक या ठिकाणी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स थाटले आहेत.

यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत काहीशी वाढ झाली असली, तरी त्याचा गणेशभक्तांच्या उत्साहावर फारसा परिणाम झालेला नाही. वाढलेल्या किमतींकडे दुर्लक्ष करीत यंदाचाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा करण्याचा निर्धार गणेशभक्तांनी केला आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande