
कोल्हापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) |शहरासाठी अत्यंत महत्वाचा प्रस्तावित तावडे हॉटेल - फुलेवाडी रिंगरोड – गगनबावडा रोड दरम्यान होणारा सुमारे 10 कि. मी चा उड्डणपुल भविष्यात कोल्हापूरची ओळख बनेल यासाठी उड्डणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याही सुचनांचा समावेश करावा तसेच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरातील डीपी रोड, रिंग रोड यांचा सुधारण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबधित यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात तावडे हॉटेलजवळील टोल प्लाझा - दसरा चौक, टेंबलाई मंदिर - फुलेवाडी मार्गे पिंपळवाडी रिंग रोड (गगनबावडा रोड) पर्यंत चार पदरी उन्नत मार्गिका (Elevated Corridor) बांधण्याचा प्रस्तावाबाबत पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, नगरसेवक शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, अभिजित खतकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी रस्त्याची सुधारणा व पार्किंगची सोय करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी शहरातील मोकळ्या जागा यांची महानगरपालिकेने निश्चिती करुन प्रस्ताव तयार करावा, महालक्ष्मी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी रस्ते व इतर विकासाचे प्रस्ताव तयार करा. शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही. यासाठी डीपीआर तयार करताना पुढील 25 ते 30 वर्षाच्या कालावधीचा विचार करुन प्रस्ताव तयार करावा, त्यासाठी तांत्रिक माहिती, लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही प्रस्तावात समोवश करण्यात यावा. शहराच्या सर्वांगिन विकास हीच जिल्ह्याची ओळख असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शहराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी घेण्यासाठी राज्यस्तरावर तातडीने बैठक घेण्यात येईल व सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले, सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि गतिमान वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर म्हणाले, शहरासाठी प्रस्तावित असलेला उड्डणपुलाचा प्रस्ताव तयार करताना शहरातील वाहतुकीची कोंडी फुटावी यासाठी ठिकठिकाणी सेवा मार्ग उपलब्ध करुन द्यावेत. दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी दरम्यान उड्डणपुल प्रस्तावित करण्यात यावा. पुलाचा डीपीआर तयार करत असताना ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात यावे.
खासदार छत्रपती शाहू महाराज यावेळी म्हणाले, शहराचा विकासासाठी करण्यात येणारे डीपीआर करण्यापुर्वी इंदोर शहरामध्ये ज्या पध्दतीने विकासाची कामे केली आहेत त्याचेही अवलोकन करण्यात यावे. तसेच उन्नत उड्डणपुल याला रत्नागिरीकडे जाणाऱ्या महामार्गाला जोडण्यात यावे.
यावेळी बांधकाम विभागाच्या वतीने संगणीकीय सादरीकरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar