सालगड्यावर वाघाच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट
वर्धा 12 सप्टेंबर (हिं.स.)। समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव शिवारात वाघाने सालगड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विशाल मुन हे गंभीर जखमी झाले असून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.शेतकरी रमेश जैस्वाल यांच्या शेतात सायंकाळ
सालगड्यावर वाघाच्या हल्ल्यानंतर वनविभाग अलर्ट


वर्धा 12 सप्टेंबर (हिं.स.)।

समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव शिवारात वाघाने सालगड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विशाल मुन हे गंभीर जखमी झाले असून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.शेतकरी रमेश जैस्वाल यांच्या शेतात सायंकाळी चारच्या सुमारास विशाल मुन काम करीत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. आमदार समीर कुणावार यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तासांपूर्वीच वन विभागाने पवनगाव परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. हल्ल्यानंतर वन विभागाने शोधमोहीम तीव्र केली आहे. सहवनक्षेत्र कोरा अंतर्गत पवनगाव, करूर, आसोला, चिखली आणि चापापूर परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त सुरू आहे. सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक व्ही. व्ही. चौधरी यांच्या नेतृत्वात वनरक्षक गोहने, नंदोरी बिट तसेच आरआरटी टीम कोरा यांच्या पथकांकडून गस्त घातली जात आहे. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी पाच ट्रॅप कॅमेरे आणि दोन लाइव्ह कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, वाघाला जेरबंद करून दुसऱ्या जंगलात स्थलांतरित करण्याबाबत आमदार समीर कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा केली असून संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. वाघाचा वावर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande