
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती स्थापना, मंडप व स्टेज उभारणीसाठी आवश्यक परवानगी आणि ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गणेश मंडळांना आवश्यक परवानगी व ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे निर्देश मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रभाग ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’साठी संबंधित प्रभागाच्या सहायक आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्सव काळात आवश्यक सुविधा व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांवरही जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांना विविध परवानग्या सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘एक खिडकी योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील प्रभाग समिती ‘ब’ कार्यालयात प्रत्येक प्रभाग समितीचा एक लिपिक उपस्थित राहणार आहे. येथे गणेश मंडळांना आवश्यक ना-हरकत व परवानगी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. संबंधित सहायक आयुक्तांच्या स्वाक्षरीने ही प्रमाणपत्रे देण्यात येतील.
रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेवर भर...
गणेशमूर्ती आगमन व विसर्जनाच्या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. गणेशमूर्ती स्थापना परिसर तसेच विसर्जन मार्गावरील विद्युत खांबांवरील पथदिवे सुरू राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश विद्युत अभियंत्यांना देण्यात आले आहेत. मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षकांना मुख्य रस्ते तसेच गणेशमूर्ती स्थापना होणार्या परिसराची दररोज स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात अस्वच्छता राहणार नाही तसेच पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावर मोकाट जनावरांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडून त्यांना बंदिस्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव सुरळीत, सुरक्षित आणि शांततेत पार पडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis