
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)
परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, प्रभावी आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक गतिमानतेने काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत ‘क्षयरोगमुक्त भारत’ या उद्दिष्टाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. क्षयरोगाची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी, एक्स-रे, वेळेत निदान, प्रतिबंधात्मक औषधोपचार तसेच रुग्णांना आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांनी नियमित नेत्र तपासणी करून घ्यावी, याबाबतही व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच विविध प्रकारच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 100 दिवसांत संबंधित तपासण्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीत माता व बाल संगोपन सेवा, नियमित लसीकरण, एएफपी सर्वेक्षण, एचपीव्ही लसीकरण तसेच नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबतही आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय लसीकरण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद, विभागीय क्षयरोग अधिकारी डॉ. कौस्तुभ दास गुप्ता, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. कदम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. शिंदे, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग डॉ. केंद्रीकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध आरोग्य कार्यक्रमांचे प्रमुख, आरोग्य कर्मचारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis