दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी परभणीत महामार्गावर रास्तारोको
खळीफाटा येथे सुमारे 500 शेतकरी तीन तास रस्त्यावर; वाहतूक ठप्प परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, अखिल भारतीय किसानसभा तसेच इतर पक्षांच
Q


खळीफाटा येथे सुमारे 500 शेतकरी तीन तास रस्त्यावर; वाहतूक ठप्प

परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, अखिल भारतीय किसानसभा तसेच इतर पक्षांच्या वतीने शनिवारी (दि. 12) गंगाखेड तालुक्यातील खळीफाटा परिसरात गंगाखेड-परभणी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे 500 शेतकरी, शेतमजूर, बटाईदार आणि वाटेकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. तब्बल तीन तास महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.

किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, पीक पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

सरकारच्या ‘महावेध’ पोर्टलवरील 3 सप्टेंबरच्या आकडेवारीचा दाखला देत किसानसभेने सरकारवर टीका केली. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.“कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला; मात्र महाराष्ट्र सरकारला दुष्काळ का दिसत नाही?” असा सवाल कॉ. राजन क्षीरसागर यांनी केला. हा रास्तारोको केवळ इशारा असून, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढविण्याचा इशाराही त्यांनी दिला.रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande