रत्नागिरी : कोकणभूमी स्थापना दिन उत्साहात
रत्नागिरी, 12 सप्टेंबर (हिं.स.) । ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेला उजाळा देत श्रीरामतीर्थ येथील रामेश्वर देवस्थानात कोकणभूमी स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गोरज मुहूर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हो
कोकणभूमी स्थापना दिन


रत्नागिरी, 12 सप्टेंबर (हिं.स.) । ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेला उजाळा देत श्रीरामतीर्थ येथील रामेश्वर देवस्थानात कोकणभूमी स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गोरज मुहूर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

धार्मिक परंपरेनुसार याच दिवशी राजराजेश्वर भगवान श्री परशुराम तथा भार्गवराम यांनी कोकणभूमीची स्थापना केली, अशी श्रद्धा आहे. भृगुकुळात जन्मल्यामुळे त्यांना भृगुराम, भार्गवराम तसेच परशु हे आयुध धारण केल्यामुळे परशुराम अशी नावे प्राप्त झाल्याचे धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतात.

श्री परशुरामांनी श्री रामेश्वर देवस्थानाची प्रतिष्ठापना केली आणि दिव्य बाणास्त्राच्या सहाय्याने श्रीरामतीर्थ सरोवराची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे. या पवित्र घटनेमुळे त्यांचे चित्त पावन अर्थात ‘चित्पावन’ झाले आणि त्यावरून कोकणातील या नगरीला ‘चिपळूण’ हे नाव रूढ झाल्याचे उल्लेख ‘श्री व्याडेश्वर माहात्म्य’ यांसह विविध प्राचीन धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आढळतात.

चिपळूणमधील श्री महासोमयाग समिती आणि ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान यांच्या वतीने कोकणभूमी पूजन, श्री देव रामेश्वर पूजन तसेच श्रीरामतीर्थ तलाव पूजन आदी धार्मिक विधी पार पडले. यावेळी चिपळूण शहरातील नागरिक, विविध स्तरांतील कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीर्थप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमास महासोमयाग समितीचे उदयशेठ चितळे, श्री जुना कालभैरव देवस्थानचे पंकजशेठ कोळवणकर, ब्राह्मण सहाय्यक संघाचे अविनाश पोक्षे, कोकणभूमी कृषी पर्यटन संस्थेच्या प्रा. डॉ. मीनल ओक, सावनी ओक, पर्यटन अभ्यासक समीर कोवळे, श्री रामेश्वर व श्री गौतमेश्वर देवस्थानचे व्यवस्थापक-पुजारी श्री. वरवडेकर तसेच विश्व हिंदू परिषद रत्नागिरी विभाग मंत्री विवेकराव वैद्य, चिपळूण प्रखंड मंत्री प्रमोद पटवर्धन आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande