
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येणार्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महानगर प्रमुख माणिक पोंढे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक असून, ते लोकशाही व संविधानिक मार्गाने मांडले जावेत. मात्र, नेत्यांबाबत वैयक्तिक अथवा आक्षेपार्ह वक्तव्ये टाळली पाहिजेत, असे पोंढे पाटील यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजासह विविध समाजघटकांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास असून, पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत विविध भूमिका असू शकतात. मात्र, समाजाच्या भावनांचा विचार करून आणि परस्परांचा सन्मान राखून संवाद होणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रश्नावर लोकशाही मार्गाने चर्चा करून तोडगा काढण्याची भूमिका असावी, असे मत पोंढे पाटील यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत बोलताना पोंढे पाटील यांनी, राजकीय टीका करताना व्यक्तिगत पातळीवरील भाषा टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यापुढेही अशा प्रकारची वक्तव्ये झाल्यास शिवसेनेकडून लोकशाही मार्गाने भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाची एकजूट आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संयमाने भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही पोंढे पाटील यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis