
सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांनी येणाऱ्या तांत्रिक अडचणी शासनाला लेखी स्वरूपात कळवाव्यात. तसेच 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदन कार्डच्या नोंदणीसाठी शहरी आणि ग्रामीण भागात विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत 24 फेब्रुवारी ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीतील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.या कालावधीत शासकीय आणि खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांना मिळालेला लाभ, प्रलंबित प्रकरणे, कर्नाटक सीमावर्ती भागातील रुग्णांना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्ड, ई-केवायसी तसेच 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वय वंदन कार्डबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी निऱ्हाळी यांनी आशा वर्कर आणि विस्तार अधिकाऱ्यांना योजनांच्या कामात सहभागी करून घेण्याबाबत सर्व तहसीलदारांना पत्राद्वारे कळविण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णांचे रेशन कार्ड ऑनलाइन करून घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.योजनेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला तरच तिचे यश निश्चित होईल. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निऱ्हाळी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड