परभणी तालुक्यासाठी नवीन १३२ केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने तयार करा - आ. राजेश विटेकर
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी परभणी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत परभणी तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेबाबत बैठक घेऊन तालुक्यातील वाढती वीज मागणी, कृषी वीज जोडण्यांची वाढती गरज आणि वीज वितरण यंत्रणेवरील वाढता
अ


परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी परभणी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत परभणी तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेबाबत बैठक घेऊन तालुक्यातील वाढती वीज मागणी, कृषी वीज जोडण्यांची वाढती गरज आणि वीज वितरण यंत्रणेवरील वाढता भार यांचा सविस्तर आढावा घेतला. भविष्यातील वाढता वीजभार लक्षात घेता परभणी तालुक्यासाठी नवीन १३२ केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या उपकेंद्रासाठी जागा निश्चित करताना दैठणा, पोखर्णी (नृ.) आणि सिंगणापूर परिसराचा प्रामुख्याने विचार करून तांत्रिक पाहणी करण्याचे निर्देश दिले. प्रस्तावित १३२ केव्ही उपकेंद्रामुळे पिंपळगाव ठोंबरे, पोखर्णी, ब्रह्मपुरी, सिंगणापूर, लोहगाव आणि जांब या ३३ केव्ही उपकेंद्रांशी संबंधित गावांना मोठा फायदा होणार आहे. तसेच तालुक्यात सुरू असलेल्या गावठाण फीडरच्या कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचनाही दिल्या.

गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन बंद ठेवून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा द्यावा, असेही स्पष्ट निर्देश दिले. तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा परभणी तालुक्याच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वीज वितरण यंत्रणेचे दीर्घकालीन नियोजन, आवश्यक क्षमतावाढ आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात आला. परभणी तालुक्यातील प्रत्येक गावाला विश्वासार्ह, सुरळीत आणि सक्षम वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.

या बैठकीला अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले यांच्यासह परभणी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, महावितरण विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande