
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला दिलासा मिळावा, तसेच जिल्ह्यात मुबलक पाऊस पडावा, यासाठी परभणी तालुक्यातील तरोडा येथे नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पावसासाठी अल्लाहकडे सामूहिक दुआ केली.
तरोडा मैदानावर विशेष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती जुबेर मोहम्मदी, नाझिम, मदरसा कासिमुल उलूम अरबिया तसेच मस्जिद अराफात, बाबर कॉलनी, परभणीचे इमाम व खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामूहिक दुआ करण्यात आली.
तरोडा, सिंगणापूर, भारसवाडा, बोरवंड, बाबळगाव, पिंपळगाव यासह परिसरातील विविध गावांमधून मुस्लिम बांधव या नमाजमध्ये सहभागी झाले.
जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पावसासाठी विशेष प्रार्थना म्हणून नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली.
यावेळी शेतकरी, नागरिक आणि पशुधनासाठी पाऊस पडावा, जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती दूर व्हावी आणि सर्वांना दिलासा मिळावा, यासाठी भावपूर्ण दुआ करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis