
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी तालुक्यातील वाढती वीज मागणी आणि वीज वितरण यंत्रणेवरील वाढता भार लक्षात घेऊन दैठणा, पोखर्णी व सिंगणापूर परिसरात नवीन 132 केव्ही उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचना आमदार राजेश विटेकर यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या. उपकेंद्रासाठी जागा निश्चित करताना या तीन गावांना प्राधान्य देऊन तांत्रिक पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परभणी तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यात वाढणारी लोकसंख्या, कृषी वीज जोडण्यांची वाढती मागणी आणि भविष्यातील वीजभार लक्षात घेता नवीन 132 केव्ही उपकेंद्राची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रस्तावित उपकेंद्रामुळे पिंपळगाव ठोंबरे, पोखरणी, ब्रह्मपुरी, सिंगणापूर, लोहगाव आणि जांब या 33 केव्ही उपकेंद्रांशी संबंधित गावांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उपकेंद्रासाठी योग्य जागेची तांत्रिक पाहणी करून दैठणा, पोखरणी व सिंगणापूर परिसराला प्राधान्य देत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश आमदार विटेकर यांनी दिले.
दरम्यान, परभणी तालुक्यात सुरू असलेल्या गावठाण फीडरच्या कामांनाही गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावठाण फीडरची कामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी सणाच्या काळात भारनियमन बंद ठेवावे, अशी महत्त्वाची सूचना आमदार विटेकर यांनी केली. त्यासाठी महावितरणने योग्य नियोजन करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्न, 33 केव्ही उपकेंद्रांवरील वाढता भार, आवश्यक क्षमतावाढ, वीजवाहिन्या तसेच प्रलंबित कामांचा आढावाही घेण्यात आला. तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वीज वितरण यंत्रणेचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचे आमदार विटेकर यांनी सांगितले.
बैठकीस अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली, कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी, जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर, विलास बाबर, एकनाथ साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, अमृत वाघ, किशोर ढगे, रामराव आरगडे, सचिन पठाडे, मधुकर खरवडे यांच्यासह परभणी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis