
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूर रेल्वे मार्गावरील बोडणा गावाच्या वळणाजवळ शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 25 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत काही विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-27/ए-9852 क्रमांकाची ही बस ऍक्सल इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, चांदूर रेल्वे रोडची आहे. बस बोडणा गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे जात होती. तपोनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील वळणावर अचानक बसचा अॅक्सल तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
बस झाडावर आदळताच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी जखमी विद्यार्थ्यांची नेमकी संख्या तसेच त्यांच्या दुखापतींची तीव्रता याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, या मार्गावर नियमितपणे बस चालविणारा चालक आज सुट्टीवर असल्याने त्याच्या जागी दुसऱ्या मार्गावर बस चालविणारा चालक ड्युटीवर असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित चालकासाठी हा मार्ग नवीन असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अपघाताचे कारण केवळ चालकाला मार्गाची माहिती नसणे हेच असल्याचे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून बसची तांत्रिक स्थिती, ऍक्सल तुटण्याचे नेमके कारण, चालकाचा अनुभव, त्याची ड्युटीवरील नियुक्ती तसेच अपघाताशी संबंधित अन्य बाबींची चौकशी सुरू आहे. तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी