
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा’ या घोषवाक्याखाली १ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडाव्यापी जनआंदोलन करण्यात येत आहे. परभणीत रविवारी (दि. १३)सकाळी११ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तर लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारला परभणीच्या रखडलेल्या विकासाचा जाब विचारण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सरकारांच्या काळात छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, घोषणा होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही परभणी जिल्ह्यातील अनेक विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही कामे कागदावरच असून काही कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे विकासाच्या घोषणांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. परभणी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळ जाहीर करावा तसेच परभणी जिल्ह्यासाठी घोषित करण्यात आलेल्या प्रमुख विकासकामांमध्ये पाथरी येथील श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुर करावा, परभणी शहर महानगरपालिका ड वर्ग महापालीका असल्याने विशेष बाब म्हणून विकास कामाकरिता दर महा ५ कोटीचा निधी द्या, परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा, क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण, सोनपेठ व पालम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, परभणी समांतर पाणीपुरवठा योजना, परभणी शहरातील मलनिस्सारण प्रकल्प आणि महानगरपालिका नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करावे अशा मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय ममदापूर उच्च पातळी बंधारा ता. पूर्णा, मनमाड-छत्रपती संभाजीनगर- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, निम्न दुधना/ परभणी संबंधित सिंचन कामे पूर्ण करणे, सोनपेठ व पालम येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उभारणे, गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, कोटवाडी व पोखर्णी नदीवर सिमेंट नाला बंधारे उभारणे, पूर्णा रेल्वे उड्डानपुलाच्या नागरी कामांसह जोडरस्त्यांचे काम सुरु करणे, परभणी महानगरपालिकेचे जीएसटी वाढीव अनुदान व फरकाची रक्कम त्वरीत देणे, विद्यापीठात उभे राहत असलेल्या सायंस पार्कच्या उर्वरीत बांधकामासाठी निधी देणे, जिंतूर शहर बायपास रस्त्याचे काम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी रुग्णालय इमारत उभारणी तसेच परभणी येथे मेगा टेक्सटाईल पार्क या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.
या जनआंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विष्णु मुरकुटे, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, महानगर प्रमुख डॉ.विवेक नावंदर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis