
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धार रस्ता ते मारिमाता मंदिर या सुमारे 1,300 मीटर रस्त्याचे मंजूर काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, हे काम तातडीने गतीने पूर्ण करावे, अशी मागणी महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक भगवानराव वाघमारे, गुलमीरखान कलंदर खान, सुनील देशमुख, फातिमा बेगम अब्दुल मुश्ताख आणि विनोद कदम यांनी केली आहे.
या पाच नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. महापालिका हद्दीतील विविध रस्त्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 65 ते 70 कोटी रुपयांच्या निविदा मंजूर केल्या आहेत. त्यामध्ये धार रस्ता ते मारिमाता मंदिर या 1,300 मीटर रस्त्याच्या कामाचाही समावेश आहे.
मात्र, या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. कामासंदर्भात संबंधित अभियंते आणि कंत्राटदारांशी सातत्याने संपर्क साधून चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकारी अभियंत्यांची दोन वेळा भेट घेऊन कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही कामात अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धार रस्ता ते मारिमाता मंदिर हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाला पुढे सुमारे 10 ते 12 गावे जोडलेली असल्याने या रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा फटका नागरिकांना तसेच वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करून नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
रस्त्याच्या कामाला येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष सुरुवात करून ते गतीने पूर्ण करावे, अशी मागणी पाचही नगरसेवकांनी केली आहे. निर्धारित मुदतीत काम सुरू न झाल्यास नागरिकांच्या सहकार्याने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis