विद्यार्थ्यांनी पक्ष्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा : माणिक पुरी
परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पक्ष्यांना कोणत्याही सीमा नसतात. त्यांचा अधिवास, दिनचर्या आणि जीवनमान वैविध्यपूर्ण असून पक्षी निरीक्षणातून निसर्गातील अनेक कुतूहलपूर्ण व नाविन्यपूर्ण बाबी उलगडतात. विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण करून त्यांच
W


परभणी, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पक्ष्यांना कोणत्याही सीमा नसतात. त्यांचा अधिवास, दिनचर्या आणि जीवनमान वैविध्यपूर्ण असून पक्षी निरीक्षणातून निसर्गातील अनेक कुतूहलपूर्ण व नाविन्यपूर्ण बाबी उलगडतात. विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण करून त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा. पक्षी हे माणसांचे मित्र असून पर्यावरण समृद्ध करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पक्षीमित्र तथा पक्षी अभ्यासक माणिक पुरी यांनी केले.

बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे आनंददायी शिक्षण उपक्रमांतर्गत माणिक पुरी यांचे ‘पक्षी निरीक्षण व अभ्यास’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण बोराडे होते. पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, सीमा बोके यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुरी म्हणाले की, पक्ष्यांचा अधिवास टिकवायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. वृक्ष हे पक्ष्यांच्या संवर्धनाचा महत्त्वाचा आधार आहेत. अनेक पक्षी शेतकर्यांचे मित्र असून शेतातील अळ्या, किडे खाऊन पिकांचे संरक्षण करतात. कावळा सडलेले अन्न खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावतो.

यावेळी त्यांनी विविध पक्ष्यांच्या अधिवासाची, आवाजांची व वैशिष्ट्यांची माहिती दिली. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल हा पिंपळ, वड, उंबर, नांदुरकी, पिपरणी, अंजीर आदी झाडांवर आढळतो. चंडोल, रातवा, राजहंस, पळस मैना, सुतारपक्षी, खाटीक पक्षी आणि चिमणी यांच्याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. रातवा पक्ष्याच्या आवाजाची नक्कल करून त्यांनी विद्यार्थ्यांना त्याचे वैशिष्ट्य समजावून सांगितले.

पक्षी निरीक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, पक्ष्यांच्या हालचाली कशा टिपाव्यात तसेच दुर्बिणीचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शनही पुरी यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande