
ठाणे, 12 सप्टेंबर (हिं.स.) : तब्बल ४० वर्षांपासूनच्या जुन्या जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंतच्या पर्जन्यवाहिनीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांच्या महासभेतील आक्रमक पवित्र्यानंतर संबंधित नाल्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.
जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंत बंदिस्त नाल्यामधील गाळ काढण्याचा ठराव सभागृहात शुक्रवारी मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी या नाल्यामुळे जांभळी नाका परिसर अनेक वर्षांपासून पुराच्या विळख्यात सापडला असल्याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधले. या नाल्याची पुनर्बांधणी करण्यासाठी ९ वर्षांपासून पाठपुरावा करीत असूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
एकेकाळी तब्बल १० फूट खोल असलेली जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंतची पर्जन्यवाहिनी जांभळी नाक्याजवळ अवघी दीड फूटांवर आली आहे. मासुंदा तलाव तुडूंब भरल्यानंतर पाण्याचा लोंढा जांभळी नाक्यावर आल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते, याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधले.
या भागात होलसेल बाजारपेठ व अनेक दुकाने असून, पावसाळ्यात नेहमी साचलेल्या पाण्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होते. त्यामुळे नव्याने पर्जन्यवाहिन्या उभारण्याचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल, त्याने घ्यावे. स्वत:च्या नावाचा बोर्ड लावावा. सर्व क्रेडिट घ्यावे. पण जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंतच्या बंदिस्त नाल्याचे काम नव्याने करावे, अशी मागणी नम्रता कोळी यांनी केली. ७२ ब नुसार अनेक प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. ही पर्जन्यवाहिनी तातडीचे काम नाही का, असा सवाल नम्रता कोळी यांनी केला. त्यानंतर या कामासाठी इंटिग्रेटेड नाला विकास योजनेतून साडेसात कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी सांगितले. त्यावेळी या कामासाठी निधी मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून दिली गेली नाही, अशी खंत व्यक्त करून सध्या पर्जन्य वाहिनीतून सांडपाणी सोडले जात आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींना प्रकल्पाचा सविस्तर आराखडा दाखविण्याची मागणी नम्रता कोळी यांनी केली. त्यानंतर या कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याचे आश्वासन महासभेत देण्यात आले.
वर्दळीच्या ठिकाणी दिव्यांग स्टॉल
सिडको बस स्टॉप, ठाणे कॉलेज, अग्निशमन दल आदी गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. मात्र, या भागात सातत्याने दिव्यांगांच्या अनेक स्टॉलला परवानगी देण्यात आली. एका रस्त्यावर किती स्टॉल असावेत, असा नियम आहे, याचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी नम्रता कोळी यांनी केली.
खाडीकिनाऱ्यावर राडारोडा
प्रभाग क्र. २२ मधील खाडीकिनाऱ्यावर बेकायदेशीरपणे राडारोडा, कॅटर्सकडून शिल्लक अन्न टाकले जात आहे. या भागातील राडारोडा उचलण्यासाठीही प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर