
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.) | महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी एकदिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री पुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी, विशेषतः महिला व बालकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी या उत्साही वातावरणावर एका अत्यंत थरारक व अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेने विरजण पडले.
यात्रेत फिरणाऱ्या एका मोठ्या आकाश पाळण्यात बसलेल्या बाली मारोती टाळीकोटे (२५, रा. फुलसावंगी) या तरुण महिलेच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली. पाळणा वेगाने फिरत असताना अचानक बाली टाळीकोटे यांचे लांब केस मागे असलेल्या पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने आणि बेरिंगचा आस फिरत असल्याने क्षणार्धात त्यांचे केस मोठ्या ताकदीने ओढले गेले. यात त्यांच्या डोक्यावरील केसांसह संपूर्ण चामडी निघून आल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.
महिला वेदनेने किंचाळल्याने आणि रक्ताच्या थारोळ्यात पाहून यात्रास्थळी एकच धावपळ आणि खळबळ उडाली. सुदैवाने, यात्रेच्या सुरक्षेसाठी तेथे तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि पोलीस जमादार सुहास कायटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ धाव घेतली. त्यांनी वेगाने फिरणारा पाळणा तातडीने थांबवला आणि अत्यंत कौशल्याने जखमी महिलेला बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.पोलीस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेवर प्राथमिक उपचार केले व पुढील आपत्कालीन उपचारासाठी त्यांना तातडीने पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र डोक्याची संपूर्ण चामडी सोलल्याने प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी