
माणगाव-इंदापूर दरम्यान तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा
रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (दि. १२) सकाळपासून माणगाव-इंदापूर दरम्यान वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने गणेशभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागला.
सामान्य परिस्थितीत दहा मिनिटांत पार होणाऱ्या अंतरासाठी कोंडीमुळे सुमारे अर्धा तास लागत होता. गेल्या दोन दिवसांपासून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम, अरुंद रस्ता, अपूर्ण बाह्यवळण मार्ग आणि काही वाहनचालकांची बेशिस्त वाहतूक यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे.
दरम्यान, खारपाडाजवळ दोन वाहने रस्त्याच्या मधोमध अडकल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. बेशिस्त वाहनचालकांमुळे या कोंडीत आणखी भर पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)