
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने पारंपरिक तपासणीसोबत आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मशिन लर्निंगचा वापर सुरू केला आहे. AIच्या माध्यमातून वीजवापरातील संशयास्पद बदलांचे विश्लेषण करून संभाव्य वीजचोरीची ठिकाणे निश्चित केली जात आहेत. या हायटेक मोहिमेत गेल्या तीन महिन्यांत राज्यात 66 कोटी 28 लाख रुपयांच्या 27 हजार 964 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत.महावितरणच्या 190 भरारी पथकांकडून वीजजोडण्यांची तपासणी केली जात असून, त्यासोबत AI मॉड्यूलच्या माध्यमातून वीजवापराच्या आकडेवारीचे सूक्ष्म विश्लेषण केले जात आहे. त्यामुळे वीजचोरीच्या संशयास्पद जोडण्या शोधून त्यांच्यावर लक्ष्यित पद्धतीने कारवाई करणे शक्य होत आहे.वीजचोरीविरोधातील या मोहिमेत आतापर्यंत वीजचोरीची रक्कम तसेच तडजोड शुल्क न भरलेल्या 289 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महावितरणने तयार केलेले AI मॉड्यूल वीजग्राहक किंवा संबंधित परिसरातील वीजवापराचा पूर्वीचा आलेख, मागणीत अचानक झालेली घट किंवा वाढ, मीटरमधील संभाव्य तांत्रिक फेरफार यासह 50 हून अधिक तांत्रिक निकषांचे 24 तास विश्लेषण करीत आहे.या विश्लेषणातून वीजवापराच्या पद्धतीत असामान्य बदल आढळल्यास संबंधित जोडणी संशयाच्या कक्षेत आणली जाते. त्यानंतर भरारी पथकांकडून प्रत्यक्ष तपासणी करून वीजचोरी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाते.महावितरणच्या या AI आधारित यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणातील वीजवापराच्या डेटाचे जलद विश्लेषण करून वीजचोरीची शक्यता असलेल्या जोडण्या शोधण्यास मदत होत आहे. त्यामुळे पारंपरिक तपासणीला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने वीजचोरीविरोधातील कारवाईला अधिक वेग आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु