
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सिंहगडावर १०० फुटी भव्य भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. या ध्वजासाठी आवश्यक असलेल्या एक एकर जागेची शुक्रवारी महापौरांनी सिंहगडावर प्रत्यक्ष पाहणी करून निश्चिती केली. ध्वज उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि संरचनात्मक बाबींची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.एमटीडीसीजवळील एक एकर जागेची पाहणी करण्यात आली. सिंहगड परिसरापासून दूरवरूनही हा भव्य भगवा ध्वज स्पष्टपणे दिसावा, याचा विचार करून मोक्याच्या ठिकाणी ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या पाहणीवेळी पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, एमटीडीसीचे चीफ रिजनल मॅनेजर हनुमंत खेडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित जागा, ध्वजस्तंभाची उंची, सुरक्षितता, संरचनात्मक बाबी तसेच परिसराच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाची माहिती घेतली. ध्वज उभारल्यानंतर रात्रीच्या वेळीही त्याचे भव्य स्वरूप उठून दिसावे, यासाठी अत्याधुनिक विद्युत रोषणाई करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येणार आहे.“सिंहगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मावळ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास सांगणारा ऐतिहासिक किल्ला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक भूमीवर उभारण्यात येणारा १०० फुटी भगवा ध्वज हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणारे प्रतीक ठरेल,” असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु