
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी ही माहिती दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जिओलॉजी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील भरती परीक्षांसाठी विशिष्ट मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या काही तास आधी तयार करण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यावर विचार करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवण्यासोबतच उत्तरपत्रिकांची तपासणी पारदर्शक पद्धतीने होईल, यावरही भर देण्यात येणार आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्याबाबत शासनाला शिफारशी करण्यात येणार असल्याचे राधा यांनी सांगितले.
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय कृती समिती नियुक्त केली आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासोबतच परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी समितीकडून विविध घटकांशी संवाद साधला जात आहे.
याच अनुषंगाने पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी टास्क फोर्सने थेट संवाद साधला. यावेळी प्रश्नपत्रिका निर्मिती व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण व्यवस्था आणि परीक्षा अनुभव याबाबत सहभागींकडून सूचना घेण्यात आल्या.
या सूचनांचा आणि विविध राज्यांतील परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून राज्य शासनाला सुधारणा करण्यासाठी शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु