
सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)
राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक’ (सूक्ष्म सिंचन) अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सन 2026-27 मध्ये निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ठिबक व तुषार सिंचनाचा लाभ देण्यासाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
अर्जासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. अर्जासोबत ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जातीचा दाखला आवश्यक आहे.या योजनेचा लाभ कमाल 5 हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवर ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार कार्यवाही केली जाणार असून, महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडतीद्वारे लाभार्थी निवडले जातील. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करता येईल. संचाची उभारणी झाल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. त्यानंतर पात्र अनुदान शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल.योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा सामाईक सेवा केंद्राशी (CSC) संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड