
सोलापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
अनुसूचित जातींच्या (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात ‘निळा विरुद्ध पिवळा झेंडा’ असा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा मातंग समाजाचे नेते उत्तमप्रकाश खंदारे यांनी मातंग समाजाचा लढा पिवळ्या झेंड्याखालीच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा निळा झेंडा आदरणीय आहे; मात्र त्याचा आधार घेत अनुसूचित जातींमधील ५६ उपेक्षित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध होत असेल, तर हा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका खंदारे यांनी मांडली.
एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत खंदारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल मातंग समाजाच्या मनात कोणताही कमीपणा नाही. मात्र, अनुसूचित जातींमधील काही समाजघटकांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नसेल, तर त्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे.
आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचावा आणि दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या समाजघटकांना न्याय मिळावा, यासाठीच उपवर्गीकरणाची मागणी करण्यात येत असल्याचे खंदारे यांनी सांगितले.
एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून, सोलापुरात या मुद्द्यावरून विविध भूमिका समोर येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड