
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र आणि सिंबायोसिस वैद्यकीय महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ लवळे येथे करण्यात आला. गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शंकर मांडेकऱ यांची प्रमुख उपस्थिती होती.
“सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले. मातेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आपुलकीची प्रसूतीसेवा मिळणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आधार, सन्मान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला.
“निरोगी माता म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजे सक्षम महाराष्ट्र,” असे सांगत पवार यांनी महिला व बालकांचे आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय नसून कुटुंब, समाज आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित असल्याचे नमूद केले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांपर्यंत मातृत्वाच्या आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. यासाठी आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे तळागाळातील महिलांना योग्य मार्गदर्शन आणि आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राने महिला शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात देशाला दिशा दिली आहे. ‘माहेरवाशीण’सारखे उपक्रम विकासाला माणुसकीची नवी दिशा देणारे आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
‘माहेरवाशीण’ उपक्रमाची संकल्पना डॉ. राजीव येरवडेकर यांनी मांडली आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेला रुग्ण म्हणून नव्हे, तर माहेरी आलेली मुलगी म्हणून सन्मान, प्रेम, आधार आणि सुरक्षितता मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु