
रत्नागिरी, 12 सप्टेंबर (हिं.स.) । राज्य विज्ञान शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (नागपूर) या संस्थेकडून राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत रत्नागिरी तालुकास्तरावर फाटक प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला.
शाळेने सादर केलेल्या हरवलेली शाळा या नाटिकेची निवड आता जिल्हास्तरासाठी झाली आहे.
तालुका विज्ञान मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत फाटक प्रशालेतील सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी विज्ञान नाट्यलेखन व दिग्दर्शन शाळेतील शिक्षक मोहन बापट यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता - मित्र, साधन की धोका? या विषयावर ही नाटिका साकारली. इरा गोखले, अवंती लिमये, विघ्नेश जोशी, मिहिर खाडिलकर, मेघना मलुष्टे, चिन्मय दामले, अंश पाटील, मानस पिलणकर हे विद्यार्थी या नाटिकेत सहभागी झाले होते. अर्णव पटवर्धन या विद्यार्थ्याने या नाटिकेसाठी पार्श्वसंगीत दिले. या नाटिकेसाठी शिक्षक श्री. वळवी यांचेही सहकार्य लाभले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. नेहा उकिडवे (दामले विद्यालय) आणि सौ. संघमित्रा कुरतडकर (निवळी हायस्कूल) आणि सौ. आकांक्षा भुर्के, (कुवारबाव उत्कर्षनगर) यांनी केले.
स्पर्धेतील यशाबद्दल फाटक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन कीर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर व सचिव राजीव गोगटे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी