पुणे - ‘ऊस रोपवाटिका : तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) येथे महासंचालक संभाजी कडूपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऊस रोपवाटिका : तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन’ या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस
पुणे - ‘ऊस रोपवाटिका : तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) येथे महासंचालक संभाजी कडूपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऊस रोपवाटिका : तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन’ या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उत्तम पाटील होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे मुख्य लेखापाल शिवाजी खेंगरे उपस्थित होते.सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उत्तम पाटील यांनी ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी ‘बियाणे बदल’ अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. वैज्ञानिक पद्धतीने रोपवाटिका व्यवस्थापन करून निरोगी, रोग व कीडमुक्त तसेच दर्जेदार बेणे तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवाजी खेंगरे यांनी बियाणे बदल कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यास ऊसाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे सांगितले. ऊस उत्पादकांनी दर्जेदार बेण्याचा वापर करून बियाणे बदल कार्यक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.या प्रशिक्षण कार्यक्रमास पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. समाधान सुरवसे यांनी केले.तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका उभारणी, दर्जेदार बेणे निर्मिती, रोपवाटिका व्यवस्थापन तसेच रोग व कीडमुक्त लागवड साहित्य तयार करण्याच्या विविध वैज्ञानिक पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande