बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ सप्टेंबरला ‘हलगी बजाव आंदोलन’
बीड, १४ सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच गत काही वर्षांपासून प्रलंबित असलेला पीकविमा आणि यंदाचा पीकविमा तातडीने अदा करावा, या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वत
शेतकरी हक्क मोर्चा


बीड, १४ सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच गत काही वर्षांपासून प्रलंबित असलेला पीकविमा आणि यंदाचा पीकविमा तातडीने अदा करावा, या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रगतिशील शेतकरी पुत्र घोडके यांनी केले.

पाली येथे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक भागांत पिकांची उत्पादकता घटली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

गत काही वर्षांपासून प्रलंबित असलेला पीकविमा, यंदाच्या पीक नुकसानीचा विमा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे आणि एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमधून शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती देऊन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande