कंदलगावच्या स्मशानभूमी आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर
- जागांची तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे निर्देश सोलापूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मौजे कंदलगाव येथील स्मशानभूमीची जागा आणि शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी केलेल्
gfd


- जागांची तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे निर्देश

सोलापूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मौजे कंदलगाव येथील स्मशानभूमीची जागा आणि शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. संबंधित जागांची तातडीने मोजणी, हद्द निश्चिती तसेच अभिलेख अद्ययावत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

कंदलगाव येथील गट क्रमांक १८३, २६१/६२ आणि ३१० या जागांची ग्रामपंचायत अभिलेखात नोंद आहे. मात्र, महसूल अभिलेखातील आवश्यक नोंदींबाबत प्रश्न निर्माण झाल्याने या जागांची प्रत्यक्ष मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्मशानभूमीसाठी असलेल्या सार्वजनिक जागेचे संरक्षण करण्याची सूचनाही प्रशासनाला करण्यात आली.

दरम्यान, कंदलगाव परिसरातील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

संबंधित जमिनीची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करून वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिक्रमण आढळून आल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

स्मशानभूमीची सार्वजनिक जागा असो किंवा शासनाची गायरान जमीन, शासकीय मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडण्यात आली. नागरिकांच्या सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने वेळ न दवडता ठोस कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

बैठकीस प्रांताधिकारी सुमित शिंदे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, मंद्रूपचे अपर तहसीलदार विष्णू बुटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित जागांची मोजणी, अभिलेख दुरुस्ती आणि अतिक्रमणावरील कारवाईबाबत प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता कंदलगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande