
सर्वसाधारण सभेपूर्वी पक्ष बैठकीत आक्रमक भूमिका
सोलापूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : राजूबाई मॅटर्निटी होम आणि राजूबाई ओपीडी दवाखान्याच्या जागेवरील बीओटी प्रकल्पाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेपूर्वी शनिवारी झालेल्या पक्ष बैठकीत प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. प्रस्तावाचा फेरविचार करून तो नव्याने सर्वसाधारण सभेसमोर सादर करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
बैठकीत स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक किसन जाधव, भारतसिंग बडूरवाले, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड यांच्यासह अन्य नगरसेवकांनी प्रस्तावातील विविध बाबींवर आक्षेप नोंदविले. जुन्या कराराची पार्श्वभूमी, प्रकल्प रखडण्यामागील कारणे, करारातील अटी तसेच महापालिकेच्या हिताचे संरक्षण या मुद्द्यांचा सखोल विचार केल्याशिवाय सध्याच्या स्वरूपातील प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
राजूबाई मॅटर्निटी होम आणि ओपीडी दवाखान्याच्या जागेवरील बीओटी प्रकल्पासाठी यापूर्वी करार करण्यात आला होता. मात्र, निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. संबंधित कंपनी लिक्विडेशनमध्ये गेल्याने प्रकल्प रखडला. आता उपलब्ध कायदेशीर अभिप्रायाच्या आधारे किशोर चंडक यांच्यासोबत नव्याने करार करून प्रकल्प पुढे नेण्याचा पर्याय प्रशासनाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.
मात्र, जुन्या प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता नव्या कराराला मंजुरी देण्यापूर्वी महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय हिताचा सर्वंकष विचार करणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. जुन्या करारातील अटी, त्याची अंमलबजावणी आणि प्रकल्प रखडल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यांचा सखोल आढावा घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडल्यानंतर त्यावर काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड