लातूरच्या देवणीत दमदार पाऊस ; बळीराजा सुखावला
लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या देवणी शहर आणि परिसरासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे देवणीकरांचा उकाडा कमी होऊन वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे
पाऊस


लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या देवणी शहर आणि परिसरासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे देवणीकरांचा उकाडा कमी होऊन वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे हाता-तोंडाशी आलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊनही पाऊस हुलकावणी देत होता. मात्र, झालेल्या जोरदार सरींनी या पावसाच्या प्रतीक्षेचा अंत झाला कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतशिवारे तृप्त झाली असून, अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ मंदावली होती, परंतु या पावसानेशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाची लकेर उमटली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, केवळ पेरणी वाचवण्यासाठी हा पाऊस पुरेसा नसून, जमिनीतील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि परिसरातील तळी, ओढे व नद्या तुडुंब भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज असल्याची भावना जाणकार व्यक्त करत आहेत. पावसाच्या पाण्याने रस्ते ओलेचिंब झाले असून, शहरातील नागरिकही या पावसाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत.

सध्या मिळालेल्या पावसाचा फायदा निश्चितच पिकांना होणार आहे. मात्र, आगामी काळातही पावसाची सातत्यपूर्ण हजेरी राहिल्यास खरीप हंगाम बहरण्याची आणि भविष्यातील पाणीटंचाईची भीषण समस्या टळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता बळीराजाचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले असून, परतीचा पाऊस दमदार बरसेल आणि जलस्रोत भरून वाहतील, अशी अपेक्षा देवणी परिसरातील जनता व्यक्त करत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande