पत्रकारांच्या गृहसंकुलासाठी हिंगोलीत मार्गदर्शन कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.)। पत्रकारांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी पत्रकार वेल्फेअर सोसायटी, हिंगोलीच्या वतीने पत्रकार गृहसंकुल उभारणीसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले. शासनाच्या
Q


छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.)। पत्रकारांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी पत्रकार वेल्फेअर सोसायटी, हिंगोलीच्या वतीने पत्रकार गृहसंकुल उभारणीसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले. शासनाच्या म्हाडा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, प्रशासकीय प्रक्रिया आणि पुढील वाटचाल याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

पत्रकारांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांचा लाभ कसा घेता येईल, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, गृहसंकुल उभारणीसाठी कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागेल, तसेच प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेसाठी कोणत्या प्रशासकीय बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे, याची माहिती पत्रकारांना मिळावी, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

कार्यशाळेस आमदार गजानन घुगे, युवा नेते शिवाजी मुटकुळे, युवा नेते शशिकांतराव वडकुते आणि जिल्हा माहिती कार्यालयातील मनोहर भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी पत्रकार गृहसंकुलाच्या संकल्पनेबाबत तसेच शासनाच्या उपलब्ध गृहनिर्माण योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

पत्रकारांचे सामाजिक योगदान, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या विविध अडचणी तसेच पत्रकारांसाठी मूलभूत सुविधांमध्ये स्वतःच्या घराची असलेली गरज यावरही उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास गृहसंकुलाच्या प्रस्तावाला योग्य दिशा मिळू शकते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यशाळेचे प्रास्ताविक पत्रकार वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत पत्रकार गृहसंकुलाच्या प्रस्तावामागील भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांना शासनाच्या योजनांची अचूक माहिती मिळावी आणि पात्र पत्रकारांना त्याचा लाभ घेता यावा, यासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहसंकुलाच्या प्रस्तावाला मिळणार दिशा

पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा पत्रकारांच्या गृहसंकुलाच्या प्रस्तावाला दिशा देणारी ठरणार आहे. शासनाच्या संबंधित योजनांची माहिती घेऊन पुढील काळात आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच गृहसंकुलाच्या प्रस्तावाला मूर्त स्वरूप देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande