
हिंगोली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेल्या मुक्तिसंग्राम लढ्याला १७ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शासनाला वचनाची आठवण करून देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी येथे भव्य 'महामोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्च्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी ताकतीने सहभागी व्हावे, असे आवाहन धनगर समाजाचे युवक नेते शशिकांत रामराव वडकुते यांनी केले आहे.
परभणी येथील महामोर्च्याच्या नियोजन व पूर्वतयारीसाठी हिंगोली येथे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महत्त्वाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाला वचनाची आठवण करून देणारा लढा गेल्या कित्येक पिढ्यांपासून धनगर समाज एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने लढा देत आहे. १ वर्षापूर्वी सुरू केलेल्या या लढ्यादरम्यान शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी आणि हक्काच्या आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला.
महाराष्ट्रात धनगरांची परभणी सिद्ध करणार
बैठकीत बोलताना शशिकांत वडकुते म्हणाले, जगात जर्मनी, भारतात परभणी... या म्हणीनुसार १७ सप्टेंबर रोजी 'महाराष्ट्रात धनगर आणि धनगरांची परभणी' हे या भव्य मोर्च्याच्या माध्यमातून सिद्ध होईल. हा महामोर्चा सरकारच्या उरात धडकी भरवणारा ठरेल. परभणीतून पेटलेली आरक्षणाच्या क्रांतीची ज्वाला संपूर्ण महाराष्ट्रात वनव्यासारखी पसरेल. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातून व तालुक्यातून धनगर बांधवांनी १७ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने परभणीकडे कुच करावे, असे आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis