लातूर : आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : तालुक्यातील उजनी येथे पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांची झालेली चिंताजनक अवस्था आणि वाढत्या आर्थिक विवंचनेच्या तणावातून ४६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रीमंत विभीषण वळके (रा. उजनी)
आत्महत्या


लातूर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : तालुक्यातील उजनी येथे पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांची झालेली चिंताजनक अवस्था आणि वाढत्या आर्थिक विवंचनेच्या तणावातून ४६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रीमंत विभीषण वळके (रा. उजनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीमंत वळके यांच्या नावावर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सुमारे ५६ हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक झाली होती. पेरणी तसेच पिकांच्या निगराणीसाठी झालेला खर्च, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि इतर देणी यामुळे ते आर्थिक अडचणीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

याच आर्थिक तणावातून त्यांनी शेतातील कोठ्यात आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती त्यांचे भाऊ बळवंत विभीषण वळके यांनी भादा पोलिसांना दिली. त्यावरून भादा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एम. एम. तांबरे यांनी नोंद प्रक्रिया केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.पावसाने साथ न दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होण्याची भीती आणि त्यात कर्जाचा वाढता ताण, या दुहेरी संकटामुळे आणखी एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande