
बीड, १४ सप्टेंबर (हिं.स.) : शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यालयातील दप्तर व विविध अभिलेखांची तपासणी करून महसूल विषयक कामकाजाचा आढावा घेतला.
नागरिकांची महसूल विषयक कामे वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच सध्या सुरू असलेल्या पीक नुकसानीच्या पाहणीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीबाबतची माहितीही त्यांनी घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी केली आणि नुकसानीच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही करावी, यावर यावेळी भर देण्यात आला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis