
जिल्हा प्रशासन उतरले बांधावर; पीक परिस्थिती, ओलावा व पाणीपातळीची पाहणी
बीड, १४ सप्टेंबर (हिं.स.) : यंदाच्या हंगामात वरुणराजाने शेतकऱ्यांवर चांगलीच अवकृपा केल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. पावसाळ्याचा हंगाम संपत असताना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने दीर्घकालीन पावसाच्या खंडामुळे खरीप पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद यासह विविध पिकांवर मोठा परिणाम झाला असून, जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके वाळू लागली आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शेतीच्या बांधावर उतरून पीक परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांकडून जिल्ह्यातील विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा आणि पाणी परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असून, त्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.
कोरडेवाडी, तरनळी, साकुड, सावरगाव, चर्हाटा, धानोरा, चिखली, हिंगणी बु., नित्रुड, बोरखेड, आहेर धानोरा आणि लिंबागणेश यासह जिल्ह्यातील विविध भागांतून माहिती संकलित केली जात आहे. पावसाचा खंड किती दिवसांचा आहे, त्याचा पिकांच्या वाढीवर किती परिणाम झाला, अपेक्षित उत्पादनात किती घट होण्याची शक्यता आहे आणि सध्याची पाणीपातळी किती आहे, याचा आढावा घेण्यात येत आहे.
कोरडेवाडी येथे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. चिखली येथे उडीद पिकाच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यात आली, तर लिंबागणेश येथे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. आहेर धानोरा येथेही पावसाच्या खंडामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली.
दरम्यान, बीड जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिके करपल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या पाहणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाहणीच्या अहवालाच्या आधारे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणती मदत किंवा उपाययोजना जाहीर केली जाते, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
साकुडमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी
अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. महसूल, कृषी आणि पंचायत यंत्रणेचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis