
बीड, १४ सप्टेंबर (हिं.स.) : शिवसेना जनसंपर्क कार्यालयात नवनियुक्त बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. माजी विरोधी पक्षनेते तथा मराठवाडा नेते आ. अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
यावेळी अशोक सकपाळ यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. बीड जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न तसेच शेतकरी, कामगार आणि मजुरांच्या समस्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हाप्रमुख उल्हास गिराम म्हणाले की, बीड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेचा लढा अधिक तीव्र केला जाईल.
पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळविण्यासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीने सज्ज आहेत.
यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने नवनियुक्त लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis