गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात दगडूशेठ बाप्पा विराजमान; हजारो भाविकांची उपस्थिती
पुणे, 14 सप्टेंबर (हिं.स.)। ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषाने पुण्यातील वातावरण भक्तिमय झाले. फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा वृंदावन येथील प्रेम मंदिराच्या
ganpati


पुणे, 14 सप्टेंबर (हिं.स.)। ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषाने पुण्यातील वातावरण भक्तिमय झाले. फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा वृंदावन येथील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये साकारलेल्या जय गणेश प्रांगणात विराजमान झाले. दगडूशेठ बाप्पांच्या नयनरम्य आगमन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, भक्तांचा जयघोष आणि फुलांनी सजलेला मयूर रथ यामुळे आगमन मिरवणुकीला विशेष दिमाख प्राप्त झाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा शुभारंभ हजारो भक्तांच्या उपस्थितीत झाला. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाच्या पारंपरिक ठिकाणी असलेल्या जय गणेश प्रांगणात श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.

या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त रोहित लोंढे तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दगडूशेठ गणपतींच्या आगमनाने पुण्यातील गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून, पुढील दिवसांत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande