ऋषीपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल
पुणे, १४ सप्टेंबर (हिं.स.) : ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित राहण्याची शक्यता
Dgaduseth Ganpati


पुणे, १४ सप्टेंबर (हिं.स.) : ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

मंगळवारी पहाटे ५ वाजल्यापासून अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक) तसेच लक्ष्मी रस्ता परिसरातील वाहतूक बंद अथवा पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर चौक या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. तसेच अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक) या मार्गावरही वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक ते बेलबाग चौक या परिसरातही आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

पर्यायी मार्ग

जिजामाता चौकातून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी गणेश रस्ता, फडके हौद चौक आणि देवजीबाबा मंदिर चौकातून उजवीकडे वळून महाराणा प्रतापसिंह रस्ता, हमजेखान चौक आणि गोविंद हलवाई चौकमार्गे पुढे जावे. त्यानंतर मंडईतील गोटीराम भैय्या चौकातून स्वारगेटच्या दिशेने जाता येणार आहे.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याने वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्ता, फुटका बुरुज चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि जिजामाता चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक ते सोन्या मारुती चौक या दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून बोहरी आळी, मिर्झा गालिब चौक, नेहरू चौक आणि गोटीराम भैय्या चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची तसेच वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हे वाहतूक बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande