
ग्रामविकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर
छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : फुलंब्री तालुक्यातील बोरगाव गणपती येथे हुतात्मा स्व. सांडू सखाराम वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ग्रामविकास २५१५ निधीतून १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी, तसेच त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारे हे स्मारक अधिक सुशोभित व प्रेरणादायी व्हावे, हा या कामामागील मुख्य उद्देश असल्याचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुहासभाऊ शिरसाठ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्रबाबा जैस्वाल, सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा मंडळ अध्यक्ष गोपाळ वाघ, जिल्हा परिषद सदस्य निखिल चव्हाण, सुरेश बोर्डे, दिलीप काळे, राजू काळे यांच्यासह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर हे स्मारक परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, त्यांच्या शौर्याची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis