
नांदेड, १५ सप्टेंबर (हिं.स.) : भारतीय समाजमनाच्या अंतरंगात जात खोलवर रुजलेली असून स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही जातीय भेदभावातून घडणारे अत्याचार हे देशाला लांच्छनास्पद आहेत, असे प्रतिपादन ऍड. डॉ. भीमराव हाटकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर एकदिवसीय प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व विषयतज्ज्ञ व्याख्याते म्हणून . डॉ. भीमराव हाटकर, डॉ. बबन जोगदंड (पुणे) तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड शिवानंद मिनगिरे उपस्थित होते.
यावेळी भीमराव हाटकर म्हणाले की, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आणि अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाने २०१५ मध्ये केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार आजही देशातील सुमारे २५ टक्के जनता, म्हणजेच प्रत्येक चौथी व्यक्ती, अस्पृश्यतेसारख्या अमानवी रूढीचे पालन करते. अनुसूचित जातीतील व्यक्तींना भेदभावपूर्ण वागणूक देण्यासोबतच त्यांच्यावर अत्याचाराच्या घटनाही घडत आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेचा वर्ष २०२५ चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून त्यामध्ये २०२४ पर्यंतची माहिती संकलित करण्यात आली आहे. या अहवालातील तपशीलानुसार देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.जातीय भेदभाव आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती आवश्यक असल्याचेही या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis