
कोल्हापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वडगाव आणि शिरोली पुलाची येथील यादववाडी परिसरातील दोन गणेश मंडळांनी गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. हातकणंगले) येथील संत रोहिदास प्रतिष्ठान मंडळ तसेच शिरोली पुलाची येथील यादववाडी भागातील श्रीराम सन्मित्र तरुण मंडळ यांच्या गणेश आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टिमचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वाढविण्यात आला.
दोन्ही मंडळांना ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर व वाद्यांचा वापर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमावलीत ठरवून दिलेल्या डेसीबल मर्यादेत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
तसेच ध्वनीची पातळी वाढवू नये, याबाबत पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली होती.
मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मंडळांनी या सूचनांचे उल्लंघन करून गणेशमूर्तीसमोर मोठ्या आवाजात डीजे सिस्टिमवर हिंदी, मराठी व इंग्रजी गाणी आणि संगीत वाजविले. त्यामुळे मानवी जीवित, आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने ध्वनीप्रदूषण केल्याचा आरोप आहे. तसेच मिरवणुकीबाबत पोलिसांनी दिलेल्या सूचना व अटी-शर्तींचे पालन न केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संत रोहिदास प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष सुरेश मनोहर कांबरे, उपाध्यक्ष श्रवण विनोद कांबरे, खजिनदार अनिकेत संजु माने, सचिव अच्युत कांबरे तसेच सदस्य उध्दवराज सु. कांबरे, पार्थ ल. कांबरे, सुजल रा. कांबरे, विशाल रा. माने, किरण ब. कांबरे आणि राकेश र. कांबरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच श्रीराम सन्मित्र तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रेयश कृष्णात यादव, उपाध्यक्ष रितेश विष्णुकांत भोसले, खजिनदार विक्रम कृष्णांत यादव, सचिव राहुल शंकर शेवाळे तसेच सदस्य किरण काळु जकाते, मयुर शिवाजी कोरे, शिवराज सुरेश यादव, संदीप जयंवत यादव, गणेश प्रल्हाद यादव आणि विश्वजीत विष्णु यादव यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मुल्ला आणि चिले करीत आहेत.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar